श्रीदत्तात्रेय जयंती: डिसेंबर २०२० - संपूर्ण पूजा विधी

श्रीदत्तात्रेय जयंती २०२० - तिथी, व्रत व पूजा विधी सहित उपाय 

मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा हि भगवान श्रीदत्तात्रेय ह्यांच्या अवतार दिवसाच्या स्वरूपात साजरी करण्यात येते. ह्या दिवसास श्रीदत्तात्रेय जयंती ह्या नावाने संबोधण्यात येते. ह्या वर्षी श्रीदत्तात्रेय जयंती हि २९ डिसेंबर २०२० रोजी साजरी केली जाईल. महायोगी प्रभू श्रीदत्तात्रेय ह्यांचे  त्रिमूर्तींच्या स्वरूपात पूजन करण्यात येते. भगवान श्रीदत्तात्रेय ह्यांना ब्रह्मा, विष्णू व महेश ह्या तिघांचे स्वरूप समजण्यात येते. पौराणिक धर्मग्रंथानुसार एका विशिष्ट व रोमांचकारी घटनाक्रमा नंतर जन्मलेल्या भगवान श्रीदत्तात्रेय ह्यांचे जीवन सुद्धा तितकेच रोमांचक, ज्ञान व मार्गदर्शनाने परिपूर्ण असे आहे. वैदिक मान्यतेनुसार भगवान श्रीदत्तात्रेय ह्यांच्यात एकाचवेळी ईश्वर व गुरु ह्यांचे रूप समाविष्ट आहे. त्यामुळेच त्यांना श्रीगुरुदेव दत्त असे सुद्धा संबोधण्यात येते. एका मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेस भगवान श्रीदत्तात्रेय ह्यांची विधिवत पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होऊन दुःख हरण होते. 

विष्णू स्वरूप श्रीदत्तात्रेय 

गुरु श्रीदत्तात्रेय हे त्रिदेवांचे संयुक्त स्वरूप आहेत. त्यांना गुरु व ईश्वर ह्या दोघांचे स्वरूप समजण्यात येते. भगवान श्रीदत्तात्रेय ह्यांना तीन मुखे व सहा हात आहेत. त्यांच्या एका बाजूस गाय व दुसऱ्या बाजूस श्वान बसलेले दिसतात. मान्यतेनुसार गुरु दत्तात्रेय ह्यांनी एकूण २४ गुरूंकडून ज्ञान प्राप्त केले. त्यांच्या गुरुत निसर्ग, पशु, पक्षी, कीटक, अजगर व मनुष्य ह्यांचा सुद्धा समावेश आहे. 

श्रीदत्तात्रेय पूजा व व्रत विधी

भक्तगणात स्मृतिगामी ह्या नावाने प्रसिद्ध असलेले भगवान श्रीदत्तात्रेय भक्त वत्सल असून भक्ताने निव्वळ स्मरण केल्यावर सुद्धा ते त्याच्यावर प्रसन्न होऊन दुःख निवारण करण्यास पुढे येतात. त्यामुळेच त्यांना स्मृतिगामी असे म्हटले जाते. भगवान श्रीदत्तात्रेय ह्यांची पूजा विधी अत्यंत साधी आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेस प्रातः स्नान केल्या नंतर भगवान श्रीदत्तात्रेय ह्यांची प्रतिमा किंवा चित्र ह्यांच्या समोर उभे राहून किंवा मनात निव्वळ स्मरण करून संकल्प करावा. ह्या दिवशी शक्य असल्यास पवित्र नदी किंवा हौदावर जाऊन स्नान करावे. दिवसभर श्रीदत्तात्रेय व्रत - वैकल्याचे पालन करावे व शक्य असल्यास गाय व कुत्रा ह्यांना अन्न खाऊ घालावे. 
भगवान श्रीदत्तात्रेय ह्यांची प्रतिमा किंवा चित्रा समोर बसून धूप, दीप, चंदन, हळद, मिठाई, फळे, फुल इत्यादी पूजेस लागणाऱ्या सर्व सामग्रीसह प्रभूंचे पूजन करावे. भगवान श्रीदत्तात्रेय ह्यांना पिवळी फुले व पिवळ्या रंगाच्या वस्तू अर्पण कराव्या. ह्या दरम्यान आपण "ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः" ह्या मंत्राचा जप करावा. ह्या दिवशी स्वतः प्रसन्न राहून इतरांना खुश करण्याचे कार्य करावे. पूजे नंतर दान व पुण्य कर्म करावे. 

श्रीदत्तात्रेय व्रत व पूजेचा लाभ 

मार्गशीर्ष पौर्णिमेस भगवान श्रीदत्तात्रेय ह्यांचे व्रत, पूजन व दर्शन केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. भगवान श्रीदत्तात्रेय ह्यांच्या पूजनाने जातक वाईट संगत व मार्गापासून परावृत्त होतो. संतती व ज्ञान मार्गाच्या कामना पूर्ण होतात. श्रीदत्तात्रेयांच्या पूजनाने सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो. जातकास सुमार्गावर जाण्याची प्रेरणा होऊन पापक्षालन होते. 

श्रीदत्तात्रेय जयंती कथा 

धर्म ग्रंथानुसार एकदा तीन देव्या पार्वती, लक्ष्मी व सरस्वती ह्यांना आपल्या पातिव्रत्य धर्मावर प्रचंड घमंड झाला होता. नारदमुनींना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांचा घमंड दूर करण्यासाठी लागोपाठ तिन्ही देवींना भेटून देवी अनुसूयेच्या पातिव्रत्य धर्माचे गुणगान केले. त्यामुळे नारदमुनी गेल्यावर तीन्ही देवी ईर्ष्येने पेटून उठल्या व त्यांनी देवी अनुसूयेचे पातिव्रत्य भंग करण्याचा विडा उचलला. ब्रह्मा, विष्णू व महेश ह्यांना आपल्या पत्नींसमोर हार पत्करावी लागली व ते तीघेही देवी अनुसूयेच्या कुटी समोर एकत्रितपणे भिकारीच्या वेशात जाऊन धडकले. जेव्हा देवी अनुसूया त्यांना भिक्षा देऊ लागली तेव्हा भिक्षा घेण्यास नकार देऊन त्यांनी भोजन करण्याची इच्छा व्यक्त केली. अतिथी सत्कारास आपला धर्म समजून देवी अनुसूया त्यांना भोजन वाढू लागली. परंतु तिघांनीही भोजन करण्यास नकार देऊन जोवर माता अनुसूया त्यांना आपल्या मांडीवर बसवून खाऊ घालणार नाही तोवर ते अन्न ग्रहण करणार नसल्याचे सांगितले. माता अनुसूयेने आपल्या पतिव्रता धर्माच्या शक्तीने तिघांची मनीषा ओळखून अत्री ऋषींचे चरणामृत त्यांच्यावर शिंपडले. त्यामुळे हे तिघेही बालरुपात परिवर्तित झाले. बालरुपात पोटभर खाऊ घातल्यावर देवी अनुसूयेने त्यांना पाळण्यात झोपवून आपल्या प्रेमाने व वात्सल्याने त्यांचे पालन पोषण करण्यास सुरवात केली. हळू हळू दिवस जाऊ लागले. अनेक दिवस झाले तरी ब्रह्मा, विष्णू व महेश घरी परत न आल्याने तीन्ही देवी चिंतीत झाल्या. आपल्या चुकीचा पश्चाताप होऊन त्या तीघी माता अनुसूयेकडे येऊन क्षमा याचना करून आपल्या पतिव्रता धर्मा समोर नतमस्तक झाल्या. माता अनुसूयेने सांगितले कि ह्या तिघांनी माझे दूध प्यायले असल्याने त्यांना बालस्वरूपातच राहावे लागेल. हे ऐकून तीन्ही देवींनी आपापला अंश एकत्र करून एक नवीन अंश तयार केला, ज्याचे नाव दत्तात्रेय असे ठेवण्यात आले. त्यांची तीन मस्तके व सहा हात झाले. तीन्ही देवांना एकत्रितपणे बालस्वरूपात दत्तात्रेय ह्यांच्या रूपात मिळविल्या नंतर माता अनुसूयेने आपले पती श्री अत्री ऋषींचे चरणामृत तीन्ही देवांवर शिंपडून त्यांना पूर्ववत रूप प्रदान केले.   

भगवान श्रीदत्तात्रेयाने २४ गुरूंकडून घेतले ज्ञान 

भगवान श्रीदत्तात्रेयांना २४ गुरु होते. ज्यात पक्षी, थलचर, जलचर जीव, मनुष्य व निसर्ग ह्यांचा समावेश आहे. ह्या सर्वांकडून त्यांनी काही ना काही ज्ञान प्राप्त केले. आपण सुद्धा ह्या २४ गुरूंकडून काही शिकू शकतो. 
१. कबुतर: कबुतर द्वय जाळ्यात अडकलेल्या आपल्या पिल्लांना बाहेर काढताना स्वतःच त्यात अडकतात. ह्याचा अर्थ असा होतो कि कोणा बद्धल अति स्नेह आपल्या दुःखास कारणीभूत होतो. 
२. मधमाशी: मधमाशी फुलांच्या रसा पासून मध तयार करते व एक दिवस मध काढून घेणारा संपूर्ण मध घेऊन जातो. गरजेपेक्षा अधिक वस्तूंचा संग्रह करू नये हे ह्यातून आपणास हे शिकावयास मिळते. 
३. टिटवी: टिटवी आपल्या चोचीत मांसाचा तुकडा धरून ठेवते, परंतु त्यास खात नाही. इतर बलवान पक्षी हे मांस टिटवी कडून हिरावून घेतात. मांसाचा तुकडा सोडल्या नंतरच टिटवीस शांतता लाभते. ह्यातून स्वतः जवळ वस्तू बाळगण्याचा विचार सोडून देणे हे शिकावयास मिळते. 
४. भुंगा कीडा: चांगला किंवा वाईट जसा विचार आपल्या मनात येतो तसेच आपले मन होते हे ह्या किडया पासून हि शिकवण मिळते.   
५. पतंगा: हा आगीकडे आकर्षित होऊन जळून जातो. त्याच प्रमाणे रूप - रंगाचे आकर्षण व खोटया मोहात अडकून जाऊ नये.  
६. फुलपाखरू: ज्या प्रमाणे विविध फुलातून फुलपाखरू पराग घेत असते , त्यातून अशी शिकवण मिळते कि जेथे काही उपयुक्त गोष्ट शिकण्यास मिळेल तेथे जाऊन त्यास ग्रहण केले पाहिजे. 
७. रेशमाचे किडे: ज्या प्रकारे रेशम किडे पेटित बंद होऊन दुसऱ्या रूपाचे चिंतन करून ते दुसरे रूप प्राप्त करतो, आपण सुद्धा एकाग्रचित्ताने तसे स्वरूप प्राप्त करू शकतो. 
८. कोळी: कोळ्या प्रमाणे भगवान सुद्धा मायाजाल रचतात व त्यास संपवितात. ज्या प्रकारे कोळी स्वतः जाळे विणतो व त्यात क्रीडा करतो व शेवटी त्या जाळ्यास स्वतःच गिळंकृत करतो, अगदी तसेच भगवान सुद्धा सृष्टीची निर्मिती करतात व नंतर त्याचा संहार करतात. 
९. हत्ती: हत्ती, हत्तीणीच्या सहवासात आल्यावर तिच्याप्रती आसक्त होतो. ह्या पासून हे शिकावयास मिळते कि संन्यासी व तपस्वी पुरुषाने कामवासने पासून दूर राहावयास हवे. 
१०. मृग: मृग हा आपल्या मस्तीत इतका हरवून जातो कि त्यास आपल्या सभोवताली असलेले वाघ किंवा इतर हिंसक प्राणी सुद्धा दिसत नाही. ह्यापासून हे शिकावयास मिळते कि जीवन आपल्या मना प्रमाणेच जगले पाहिजे.
११. मत्स्य: जाळ्याच्या काट्यात अडकलेल्या मांसाचा तुकडा खाण्याच्या लालसेने मासा अडकला जातो. म्हणजेच स्वादास अधिक महत्व देऊ नये. 
१२. सर्प: सापा पासून अशी शिकवण मिळते कि संन्याशाने एकट्यानेच आपले जीवन व्यतीत करावयास हवे. तसेच केव्हाही एकाच स्थानी जास्त थांबू नये.  
१३. अजगर: आपण जीवनात अजगरा प्रमाणे संतुष्ट राहावयास हवे. म्हणजेच जे काही मिळेल त्याचा खुशीने स्वीकार केला पाहिजे. 
१४. बालक: बालका पासून हे शिकावयास मिळते कि नेहमी चिंतामुक्त व प्रसन्न राहावयास हवे.
१५. पिंगला वेश्या: एके दिवशी पिंगला वेश्येच्या मनात वैराग्याची भावना प्रगटली व तिला समजले कि पैश्यात नाही परंतु परमात्म्याच्या ध्यानातच खरे सुख दडलेले आहे, तेव्हा तिला सुखाची निद्रा आली. त्या पासून दत्तात्रेयांनी हे शिकले कि निव्वळ पैश्यांसाठी जीवन जगू नये. 
१६. कुमारिका: एकदा दत्तात्रेयांनी एका कुमारिकेस धान्य सडताना पाहिले व त्यांच्या असे निदर्शनास आले कि ह्या दरम्यान तिच्या बांगड्यांच्या आवाजाने बाहेर बसलेल्या पाहुण्यांना त्रास होत आहे. हे बघून त्या कुमारिकेने आपल्या सर्व बांगड्या तोडून दोन्ही हातात फक्त एकच बांगडी ठेवली. त्या नंतर त्या कन्येने कोणताही आवाजा शिवाय धान्य सडून घेतले. तसेच आपण सुद्धा बांगड्यां प्रमाणे एकटेच जीवन जगण्याचे साहस केले पाहिजे.  
१७. तीर बनविणारा कारागीर: अभ्यास व वैराग्याने आपले मन वश केले पाहिजे. दत्तात्रेयाने एका तीर बनविणाऱ्या कारागिरास बघितले कि जो आपल्या कामात इतका मग्न होता कि आपल्या बाजूने राजा गेला तरी त्याची एकाग्रता ढळली नाही.  
१८. आकाश: प्रत्येक देश, काळ, परिस्थितीत मोहा पासून दूर राहावयास हवे असे दत्तात्रेयाने आकाशा कडून शिकून घेतले.   
१९. पाणी: आपण पाण्या प्रमाणे निर्मळ राहिले पाहिजे. 
२०. सूर्य: ज्या प्रमाणे सूर्य विविध माध्यमातून वेग वेगळा दिसतो त्याच प्रमाणे आत्मा एक असून हि भिन्न रूपात दिसत असतो. 
२१. वायू: चांगल्या किंवा वाईट जागी जाऊन सुद्धा वायूचे मूळ रूप स्वच्छताच असते. बरोबर तसेच चांगल्या किंवा वाईट लोकांच्या सहवासात असताना सुद्धा आपला चांगुलपणा सोडू नये. 
२२. समुद्र: समुद्रा प्रमाणे जीवनातील चढ - उतारात सुद्धा खुश व गतिशील राहावयास हवे. 
२३. अग्नी: कशी हि परिस्थिती असली तरी आपण त्यातून निभावून गेले पाहिजे. ज्या प्रमाणे अग्नी वेग वेगळा असून हि एकच असल्याचे दिसते. 
२४. चंद्र: आत्मा लाभ - हानीच्या पलीकडे आहे. बरोबर तसेच वृद्धी - क्षय असता हि चंद्राचे तेज व शीतलता बदलत नसून नेहमी एक सारखीच राहते. 
२५. पृथ्वी: पृथ्वी पासून सहनशीलता व परोपकाराची भावना शिकावयास मिळते. पृथ्वीवर लोक अनेक प्रकारचे आघात करतात, परंतु पृथ्वी प्रत्येक आघातास परोपकाराच्या भावनेने सहन करते. 

आचार्य परशुराम ह्यांच्या इनपुट सह 
एस्ट्रो डॉट लोकमत डॉट कॉम