शाकाहारी कि मांसाहारी भोजन - एक ज्योतिषीय विश्लेषण


सामान्यतः ज्योतिष शास्त्रा बद्धलचा एक समज असा आहे कि हे शास्त्र निव्वळ आपल्या भविष्य विषयक बाबींची उत्सुकता जाणून घेण्याचे एकमेव साधन आहे. मात्र, ज्योतिष विज्ञान ह्या व्यतिरिक्त आपली जीवनशैली व त्यास उपयुक्त दिशा दर्शविण्या सारख्या अनेक गोष्टींचे मार्गदर्शन करत असते. आपल्या राहणीमाना पासून ते थेट आपल्या भोजना पर्यंत असलेला ग्रहांच्या प्रभावाचे मार्गदर्शन सुद्धा ते करते. ज्योतिष शास्त्रानुसार आपण ग्रहण केलेले भोजन आपल्या ग्रहांना अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम देण्यास प्रेरित करत असते. येथे आपण खाद्य ज्योतिष म्हणजेच फूड ऍस्ट्रोलॉजी व त्याचा प्रभाव ह्या बद्धल जाणून घेऊ, ज्यामुळे आपणास आपल्या राशीनुसार साधे सोपे उपाय निवडता येतील व त्या प्रमाणे आहाराचे नियोजन करता येईल ..... 

काय आहे फूड ऍस्ट्रोलॉजी ?

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक राशीचा संबंध विशिष्ट खाद्य पदार्थांशी येत असल्याने त्याचा आपल्या जीवनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. भोजनाचा होत असलेल्या ह्या प्रभावाचा सकारात्मक परिणाम मिळविण्यासाठी ज्योतिष शास्त्राची आपणास जी मदत होत असते त्यास फूड ऍस्ट्रोलॉजी असे संबोधण्यात येते. कोणत्या राशीच्या व्यक्तीने काय खावे व काय खाऊ नये कि जेणे करून त्यास ग्रहांची अनुकूलता लाभेल हे निर्देशित करणाऱ्या शास्त्रास सोप्या व सरळ भाषेत फूड ऍस्ट्रोलॉजी किंवा खाद्य ज्योतिष शास्त्र असे संबोधण्यात येते. 

भोजनाचे प्रकार व प्रभाव 

मनुष्य आपले अस्तित्व टिकविण्यासाठी तीन गोष्टींवर अवलंबून असतो. हवा, पाणी व भोजन ह्या त्या तीन गोष्टी होय. त्यात हवा व पाणी हे प्रत्येकास समान रूपात प्राप्त होत असतात. परंतु, त्याच्या स्वादानुसार व आवडीनुसार तो भोजनास प्राधान्य देत असतो. श्रीमद भगवत गीतेनुसार भोजनाचे तीन गट करण्यात आले आहेत. सात्विक, राजसी व तामसी हे ते तीन गट असून त्यांना ग्रहण करण्या विषयी व त्यांच्या प्रभावा विषयी आपणास पौराणिक ग्रंथात विस्तृत प्रमाणात माहिती मिळते. 

फूड ऍस्ट्रोलॉजी (खाद्य ज्योतिष) व प्राचीन धार्मिक ग्रंथात भोजनाच्या ह्या तीन गटांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. खोलवर पाहता असे आढळून येते कि शाकाहारी भोजनात मांसाहारी भोजनाहून सात्विक गुण अधिक असतात. तर मांसाहारी भोजनात शाकाहारी भोजनापेक्षा जास्त तामसी गुण असल्याचे दिसून येते. सात्विक भोजन हे कोणत्याही व्यक्तीस आध्यात्मिक व शांततामय जीवन जगण्यास प्रेरित करतात. तर तामसी भोजन हे आपणास अशांत व हिंसक बनवू शकते. असे असले तरी आपले भोजन हे आपले जन्मस्थळ व तेथे उपलब्ध असलेल्या खाद्य सामग्रीवर अधिक अवलंबून असते. परंतु, भोजनाची निवड करताना आपण काळजी घेतल्यास त्याच्या दूरगामी दुष्परिणामां पासून बचाव करण्यास आपणास मदत होऊ शकते. 

मांसाहारी भोजन करणे पाप आहे का ?

ह्याचे साधे व सोपे उत्तर हे आपली मान्यता व आपल्या धर्माचरणावर आधारित असू शकते. परंतु, फूड ऍस्ट्रोलॉजीत आपणास मांसाहारा विषयी विस्तृत व अधिक माहिती मिळते. फूड ऍस्ट्रोलॉजी हि ज्योतिष शास्त्राचीच एक शाखा असल्याने मांसाहारास अनुचित व विकृत प्रवृत्ती समजण्यात येते. कारण ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक सजीव प्राण्यात एक चैतन्य आत्मा असतो व कोणत्याही चैतन्येस कोणत्याही प्रकारे त्रास देणे ज्योतिष शास्त्रात निषिद्ध मानण्यात येते. त्यामुळेच मांसाहाराचे सेवन करणे हे ज्योतिष शास्त्रात पूर्णपणे निषिद्धच आहे. मांसाहाराचा प्रभाव आपल्या ग्रहमानावर होत असून आपणास मिळणाऱ्या फलात नकारात्मक परिवर्तन घडू शकते.