ह्या सप्त ऊर्जा चक्रांवर नियंत्रण मिळविल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतील


भारतीय शास्त्रानुसार प्रत्येक जीव जंतूत एक चेतना असते. परंतु ती निष्क्रिय अवस्थेत असते. आपले पूर्वज, ऋषीमुनी ह्यांनी आपणास ह्या निष्क्रिय चक्रांच्या जागृतीने आपल्या जीवनाचे उद्दिष्ट साध्य करून मोक्ष प्राप्तीचे अनेक मार्ग दाखविले आहेत. आपणास त्यांनी संपूर्ण सुष्टीच्या शक्तींना केंद्रस्थानी ठेवून वेद, ग्रंथ, उपनिषद ह्यात ह्या संबंधी ज्ञान व विज्ञान सांगितले आहे. आपले शरीर हे कशा प्रकारे सुष्टीच्या सर्व शक्तींचे केंद्रस्थान असून त्या शक्तींना प्राप्त करण्यासाठी आपणास आपल्या मूळ सात चक्राना कसे जागृत करावे लागेल हे त्यांनी आपणास सांगितले आहे. ह्या चक्रांच्या माध्यमातून आपण त्या चैतन्यास प्राप्त करणे हेच मानव जीवनाचे ध्येय आहे. तर आता आपण ह्या चक्रां विषयी जाणून घेऊ ..... 

काय व कसे काम करतात हि मूळ चक्रे 

तसे पाहू गेल्यास मनुष्याच्या शरीरात अनेक चक्र असतात, परंतु योग व आयुर्वेदात ज्यांना मूळ चक्रे मानण्यात आली आहेत त्यांची संख्या ११४ आहे. त्यातील ७ चक्रानाच मूळ आधार चक्र मानण्यात येते. आयुर्वेदात नाड्यांचा संगम किंवा त्यांचा एकमेकांशी होणाऱ्या मिलनासच चक्र म्हटले गेले आहे. ह्या नाड्यांचे मिलन स्थान अधिकतर त्रिकोणाकारच असते, परंतु तरीही त्यांना चक्र म्हटले गेले आहे. 
शरीरातील नाड्यांच्या ह्या त्रिकोणीय मिलन बिंदूंना चक्र संबोधण्या मागे त्यांची कार्यशीलता किंवा निरंतरता हे मुख्य कारण आहे. शरीरातील हे त्रिकोणीय मिलन बिंदू शरीराच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूस गतिशीलता दर्शवित असल्याने त्यांना चक्र ह्या नांवाने संबोधण्यात येते. ह्या चक्रांचे मुख्य कार्य शरीरातील चेतनेस किंवा उर्जेस खालून वर पर्यंत हस्तांतरित करणे हे आहे. 

ऊर्जा चक्रांचे क्रम व कार्य 

१. मूलाधार चक्र - मानवी शरीरातील गुदस्थान व जननेंद्रिय ह्या मध्ये हे चक्र असून ते भौम मंडळ ह्या नांवाने सुद्धा ओळखले जाते. चार पाकळ्यांचे हे आधार चक्र भौतिक स्वरूपात सुगंध व आरोग्याचे नियंत्रण करते. आध्यात्मिक दृष्ट्या हे चक्र धर्म, अर्थ, काम व मोक्ष ह्यांच्याशी जोडले गेलेले असते. ज्या लोकांच्या जीवनात भोग, संभोग व निद्रेस प्राधान्य असते त्यांची ऊर्जा ह्या चक्राच्या अवती - भोवती एकत्रित झालेली असते. 
हे चक्र जागृत करण्यासाठी भोग, संभोग व निद्रा ह्यावर मात करण्याची आवश्यकता असते. हे चक्र जागृत झाल्यावर निर्भयता प्राप्त होऊन सिद्धी प्राप्त होतात. 
ह्या चक्राचे बीज मंत्र आहे - “लं”

२. स्वाधिष्ठान चक्र - जननेंद्रियांच्या बरोबर मागे पाठीच्या कण्यावर हे चक्र स्थित असून त्यास सहा पाकळ्या असतात. ह्याचा आकार अर्धचंद्राकार असतो. हे चक्र जागृत करून आपण अविश्वास, अवहेलना, सर्वनाश, आग्रह, क्रूरता ह्या सारख्या भावनांवर नियंत्रण मिळवू शकता. परंतु हे चक्र जर निष्क्रिय असेल व त्यावर सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होत नसेल तर आपण आनंद - प्रमोद, मौज - मस्ती, हिंडणे - फिरणे व मनोरंजनात्मक भावनां मध्ये गुंतून जाल व आयुष्य कधी संपुष्टात येत आहे  हे आपणास समजणार सुद्धा नाही.
ह्या चक्राचे बीज मंत्र आहे - “वं”

३. मणिपूर चक्र - बेंबीच्या बरोबर मागे हे चक्र दहा पाकळ्यांनी युक्त असते. रक्त वर्णाचे हे चक्र अग्नी तत्वास नियंत्रित करते. ह्या चक्रास ऊर्जेचे केंद्र मानण्यात येते व ज्या व्यक्तीची ऊर्जा ह्या चक्रातून प्रवाहित होत असते त्यास कर्मयोगी म्हटले जाते. अशी व्यक्ती सर्व गोष्टींचा त्याग करून फक्त काम करण्यावरच आपले लक्ष केंद्रित करते. हे चक्र सक्रिय झाल्याने मोह, भीती, घृणा, लज्जा, ईर्ष्या, चहाडी ह्या सारख्या भावना नियंत्रित होतात. राजस गुणांचे हे चक्र आत्मशक्ती, आत्मबल व आत्मसन्मानाची वृद्धी करते. ह्या गुणांमुळे व्यक्ती जीवनातील सर्व समस्यांचा सामना करू शकते. 
ह्या चक्राचे बीज मंत्र आहे - “रं”

४. अनाहत चक्र - सात ऊर्जा चक्रातील हे चौथे चक्र आहे. हृदयाच्या बरोबर मागे पाठीच्या कण्यावर हे स्थित असलेले चक्र सत्वगुण प्रदान करते. १२ पाकळ्यांचे हे चक्र षटकोनी असते. हे चक्र जागृत झालेली व्यक्ती सृजनशील, नेहमी काही तरी नवीन रचना करणारा, संशोधक असू शकते. हे चक्र जागृत झाल्याने मोह, कुतर्क, कपट, चिंता, हिंसा, दंभ, अहंकार व अविवेकाची समाप्ती होते. त्याच बरोबर अशी व्यक्ती सुरक्षित, चारित्र्यवान, आत्मविश्वासाने भरलेली, जवाबदार व भावनात्मक दृष्ट्या संतुलित होते. 
ह्या चक्राचे बीज मंत्र आहे - “यं”

५. विशुद्ध चक्र - १६ पाकळ्यांचे हे चक्र सरस्वतीच्या स्थानी कंठाच्या बरोबर मागे स्थित असते. त्याचा वर्ण बहुरंगी व आकार अनियमित असतो. हे चक्र जागृत झाल्यास सोळा कला व सोळा विभूतींचे ज्ञान प्राप्त होते. एका मान्यतेनुसार संगीतातील सात सुरांचा जन्म ह्या चक्रातूनच झाला. हे चक्र जागृत झाल्याने भौतिक ज्ञान, भगवंतास समर्पण, कल्याण, महान कार्य, विष व अमृत समान वृत्ती नियंत्रित होतात. 
ह्या चक्राचे बीज मंत्र आहे - “हं”

६. आज्ञा चक्र - हे चक्र दोन भुवयांच्या मध्ये भृकुटीत स्थित असते. दोन पाकळ्यांचे हे चक्र असून त्याची एक पाकळी पांढरी व एक काळी असते. ह्या चक्राच्या प्रतीक रूपात २ विरुद्ध रंगाच्या पाकळ्यांच्या माध्यमातून भगवंत व संसार ह्यांचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला जातो. 
ह्या चक्राचे बीज मंत्र आहे - “ह” “क्ष”

७. सहस्त्रार चक्र - मस्तकात शेंडीच्या स्थानाच्या बरोबर खाली हे चक्र स्थित असून त्यास सहस्त्र पाकळ्या असतात. शुभ्र पांढऱ्या रंगांच्या ह्या चक्रास तंत्राची काशी असे सुद्धा म्हणतात. जर एखाद्या व्यक्तीने यम, नियमांचे पालन करून मागील सहा चक्रां सहित ह्या चक्रास सुद्धा जागृत केले तर ती व्यक्ती परमहंस पदास प्राप्त करू शकते. मूलाधारा पासून सहस्त्रार चक्रा पर्यंत पोचणाऱ्या मनुष्याचा संसार, संन्यास व सिद्धींशी काही संबंध येत नाही. ह्या चक्राचे कोणतेही बीज मंत्र व ध्यान मंत्र नाही.