अष्ट सिद्धि, नव निधी प्राप्तीसाठी आद्यशक्तीच्या उपासनेचे पर्व म्हणजेच नवरात्री


नवरात्रीत देवीच्या नऊ विभिन्न स्वरूपाचे निष्ठापूर्वक पूजन केल्याने अनेक पटीत फळ मिळते


वर्षातून चैत्र, आषाढ, आश्विन व माघ अशा ह्या चार महिन्यात एकूण चार वेळा नवरात्र येत असते. परंतु, ह्यात आद्यशक्तीची उपासना करून रिद्धी - सिद्धी व शक्तीचे वरदान मिळविण्यासाठी आश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रीस एक वेगळेच महत्व आहे. आश्विन महिन्यात येणाऱ्या ह्या नवरात्रीत नऊ दिवस घरात आद्यशक्तीची स्थापना करून त्यांच्या भक्तीत व उपासनेत रमून जाणाऱ्या भक्तांच्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात. नवरात्रीत अंगणात किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर रांगोळीने स्वस्तिक काढून संध्याकाळी दिपक प्रज्वलित करून उदबत्त्तीने त्यास ओवाळावे. शक्य असल्यास घरात जास्तीत जास्त प्रकाश राहील ह्याची व्यवस्था करावी. माता भगवतीस संपूर्ण जगातील सर्व शक्तींची जननी असल्याचे मानण्यात येते. घरात रोज दुर्गा सप्तशतीचे पठन करण्यात आल्यास भगवती मातेची कृपा नक्कीच होते. नवरात्रीत मातेची उपासना केल्याने भक्तांचा भांडार भरलेलाच राहतो. धन - धान्य - संपत्तीत वृद्धी होते. लक्ष्मी स्थिर राहून आपल्या घरात ती निवास करते. व्यापारात मोठी वृद्धी झाल्याने आर्थिक चणचण कधीच जाणवत नाही. जर कर्ज झाले असेल तर ते फेडले जाते. आश्विन महिन्यातील नवरात्री दरम्यान माता जगदंबेच्या नऊ स्वरूपाची पूजा - अर्चना करण्यात येते. ज्यात त्यांची उत्पत्ती व मनोकामने प्रमाणे मिळणाऱ्या फळास वेगळे महत्व आहे. शक्तिरूपातील माता जगदंबेच्या बाबतीत सांगावयाचे म्हणजे ...... 

पहिल्या दिवशी आद्यशक्तीचे पहिले स्वरूप श्री शैलीपुत्री हिचे पूजन करण्यात येते. हिंदू शास्त्रानुसार हे स्वरूप हिमालय कन्येचे असल्याने त्यास शैलीपुत्री ह्या नावाने  संबोधण्यात येते. सौभाग्य प्राप्तीसाठी हिचे पूजन करण्यात येते. हिच्या पूजेचा मंत्र खालील प्रमाणे आहे.   
वंदे वाद्द्रिछतलाभाय चंद्रार्धकृतशेखराम |
वृषारूढां शूलधरां शैलपुत्री यशस्विनीम्‌ ||

दुसऱ्या दिवशी आद्यशक्तीचे दुसरे स्वरूप माता ब्रह्मचारिणी हिचे पूजन करण्यात येते. हिने भगवान श्री शंकर ह्यांना कठोर तपस्या करून पतीच्या रूपात प्राप्त केले होते. हिला तपश्चारिणी नांवाने सुद्धा संबोधण्यात येते. कोणत्याही कार्यात अपेक्षित यश प्राप्तीसाठी हिचे पूजन करण्यात येते. माता ब्रह्मचारिणीच्या पूजेचा मंत्र खालील प्रमाणे आहे. 
या देवी सर्वभूतेषु माँ ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।
दधाना कर पद्माभ्याम अक्षमाला कमण्डलू।
देवी प्रसीदतु मई ब्रह्मचारिण्यनुत्तमा।।

तिसऱ्या दिवशी आद्यशक्तीचे तिसरे स्वरूप असलेल्या माता चंद्रघंटेचे पूजन करण्यात येते. हिच्या पूजनास शास्त्रात खूप महत्व आहे. ह्या मातेच्या मस्तकावर घंटेच्या आकारातील अर्धचंद्र असल्याने तिला चंद्रघंटा ह्या नांवाने संबोधण्यात येते. निरोगी शरीरासाठी तसेच चालू असलेल्या रोगापासून मुक्ती मिळविण्यासाठी हिचे पूजन करण्यात येते. माता चंद्रघंटा हिच्या पूजेचा मंत्र खालील प्रमाणे आहे. 
पिण्डज प्रवरारुढ़ा चण्डकोपास्त्र कैर्युता |
प्रसादं तनुते मह्यं चंद्र घंष्टेति विश्रुता ||

चौथ्या दिवशी आद्यशक्तीचे चौथे स्वरूप असलेल्या माता कृष्माण्डा हिचे पूजन करण्यात येते. हिच्या पूजा - अर्चनेने उत्तम सौंदर्य व प्रभावशाली व्यक्तिमत्व प्राप्त होते. हिला आदिस्वरूप किंवा आदिशक्ती ह्या नांवाने सुद्धा संबोधण्यात येते. ह्याचे कारण असे आहे कि शास्त्रानुसार हिच्या पोटातून ब्रह्माण्डाची उत्पत्ती झाली आहे. हिच्या पूजनाने अष्ट सिद्धी, नव निधी ह्यांची प्राप्ती होते. हिच्या पूजेचा मंत्र खालील प्रमाणे आहे. 
सुरासम्पूर्णकलशं रुधिराप्लुतमेव च ।
दधाना हस्तपद्माभ्यां कूष्माण्डा शुभदास्तु मे ॥

आद्यशक्तीच्या पाचव्या स्वरूपास श्री स्कंदमाता ह्या नावाने ओळखण्यात येते. हि श्री स्कन्द ( कुमार कार्तिकेय) ह्याची माता असल्याने हिला श्री स्कंदमाता म्हटले जाते. हिचे निष्ठा व भावपूर्वक पूजन केल्याने संतती प्राप्तीचे सौख्य लाभते. हिच्या पूजनाने भगवान श्री कार्तिकेय ह्यांची कृपा सुद्धा प्राप्त होते. श्री स्कंदमाता हिच्या पूजेचा मंत्र खालील प्रमाणे आहे. 
सिंघासनगता नित्यम पद्माश्रितकरद्वया |
शुभदास्तु सदा देवी स्कन्द माता यशश्विनी ||

सहाव्या दिवशी माता आद्यशक्तीचे सहावे स्वरूप असलेल्या श्री कात्यायनी हिचे पूजन करण्यात येते. महर्षी कात्यायनी ह्यांनी कठोर तपस्या केल्यावर माता आद्यशक्ती त्यांच्यावर प्रसन्न होऊन तिने महर्षी कात्यायनी ह्यांच्या घरी कन्येच्या रूपात जन्म घेतला होता. ह्यामुळे हिला श्री कात्यायनी ह्या नावाने संबोधण्यात येते. माता कात्यायनीच्या पूजनाने मनोवांच्छित पती प्राप्त होतो तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात. माता कात्यायनीच्या पूजेचा मंत्र खालील प्रमाणे आहे. 
कात्यायनि महामाये महायोगिन्यधीश्वरि । 
नन्द गोपसुतं देविपतिं मे कुरु ते नमः ॥

माता आद्यशक्तीचे सातवे स्वरूप म्हणजे काळरात्री. काळ म्हणजे वेळ व विनाश. अर्थात माता काळरात्री काळाचा सुद्धा नाश करते. माता काळरात्रीच्या पूजनाने शत्रूंवर मात करता येते, तसेच जीवनातील नैराश्य रुपी अंधार सुद्धा दूर होऊन आशेची किरणे प्रकाशमान होतात. माता काळरात्रीच्या पूजेचा मंत्र खालील प्रमाणे आहे. 
वाम पादोल्ल सल्लोहलता कण्टक भूषणा |
वर्धन मूर्ध ध्वजा कृष्णा कालरात्रि भर्यङ्करी || 

शास्त्रानुसार आठव्या दिवशी माता आद्यशक्तीचे आठवे स्वरूप असलेल्या श्री महागौरीच्या पूजनास महत्व आहे. हि गौर वर्णाची असून तिला चार हात व तीन नेत्र असतात. जगातील सर्व अनिष्ट प्रभावा पासून तसेच भौतिक जीवनातील सर्व दुःखांपासून माता महागौरी मुक्त करते. माता महागौरीच्या पूजेचा मंत्र खालील प्रमाणे आहे. 
श्वेते वृषे समारूढा श्वेताम्बरधरा शुचिः |
महागौरी शुभं दद्यान्त्र महादेव प्रमोददा ||

आद्यशक्तीचे नववे स्वरूप म्हणजे श्री सिद्धीदात्री. जीवनातील सर्व सिद्धी प्राप्त करण्यासाठी तसेच यशाचे शिखर गाठण्यासाठी मातेच्या ह्या स्वरूपाचे भावपूर्वक पूजन करण्यात येते. माता सिद्धीदात्रीच्या पूजेचा मंत्र खालील प्रमाणे आहे. 
सिद्धगधर्व यक्षाद्यैरसुरैरमरैरपि।
सेव्यमाना सदा भूयात सिद्धिदा सिद्धिदायिनी।।

आपली नवरात्र मंगलमय व शुभ फलदायी होवो हि प्रार्थना 

गणेशजींच्या आशीर्वादांसह 
एस्ट्रो लोकमत डॉट कॉम