जन्माष्टमी विशेष: श्री कृष्ण जन्म लीला व जीवन दर्शन

अवतार भूमिका - तसे पाहू गेल्यास अनेक पौराणिक ग्रंथात भगवान श्री कृष्ण ह्यांच्या जन्माचे वर्णन आढळून येते. परंतु जनमानसात प्रचलित असलेल्या स्कंध पुराणानुसार भगवान विष्णूंनी द्वापार युगात वाढत असलेला अधर्म व अत्याचार ह्यांच्या पासून मानवता टिकविण्यासाठी वासुदेव - देवकी ह्यांच्या पोटी ८ व्या पुत्राच्या रूपात जन्म घेतला. पुराणात असे सांगण्यात आले आहे कि देवकी व वासुदेव ह्यांना देवकीचा भाऊ कंस ह्याने एक आकाशवाणी झाल्या नंतर कारावासात टाकले होते. ह्या आकाशवाणीनुसार वासुदेव व देवकी ह्यांचा ८ वा पुत्रच कंसाच्या मृत्यूस कारणीभूत होईल. त्यामुळे कंस ह्याने देवकी व वासुदेव ह्यांच्या ७ शिशूंना जन्मताच मारून टाकले होते. 

कृष्ण अवतार व महिमा ..... 

असे सांगण्यात येते कि जेव्हा भगवान श्री कृष्ण ह्यांचा जन्म झाला तेव्हा आपोआपच तुरुंगाची दारे व देवकी - वासुदेव ह्यांच्या बेड्या सुटल्या. सर्व पहारेकरी गाढ झोपले. काळ्या ढगांनी संपूर्ण आकाश आच्छादित झाले, सोसाट्याचा वारा वाहू लागला, आकाशात विजा कडाडू लागल्या व देवकी विलापी अवस्थेत असतानाही कंस ह्याच्या भीतीने नवजात कृष्णास एका टोपलीत ठेवून वासुदेव मथुरा येथून नंदगाव येथे घेऊन गेले. 
परंतु रस्त्यात वासुदेवांची वाट यमुना नदीने अडवून ठेवली होती. जोराचा पाऊस कोसळत असताना यमुना नदी ओलांडणे खूपच कठीण होते, परंतु जसे वासुदेवांनी आपले पहिले पाऊल यमुनेत टाकले तसे माता यमुनेने त्यांना वाट देण्यास सुरवात केली व शेषनाग छत्र होऊन प्रभूंचे रक्षण करू लागले. आता खांदाभर वाहत्या पाण्यातून वासुदेव नवजात कृष्णास घेऊन नंदगावाकडे जाऊ लागले. नंदगावी गेल्यावर नवजात शिशुला तुळशी वृंदावनात झोपलेली आपली बहीण यशोदा हिच्या कडे सोडून वासुदेव मथुरेस परतले. वासुदेव मथुरेस परतल्यावर सर्व काही पूर्ववत झाले. 

कृष्ण बाल लीला…….
जसोदा हरि पालनै झुलावै।
हलरावै दुलरावै मल्हावै जोइ सोइ कुछ गावै।।

ह्या पंक्ती भगवान श्री कृष्ण ह्यांच्या बाल रूपाचे सुंदर वर्णन करतात. परमभक्त कविराज सूरदास रचित ह्या पंक्तीत माता यशोदा बाळकृष्णास झोपवण्याचा प्रयत्न करत आहे. यशोदा कधी पाळण्यास झुलवते तर कधी बाळकृष्णावर प्रेमाचा वर्षाव करते. असे करत असताना ती सहजपणे ह्या पंक्ती गुणगुणते. कविराज सूरदास ह्यांनी आपल्या अनेक कवितां मध्ये भगवान श्रीकृष्ण ह्यांच्या बाल लीलांचे खूपच सुंदर असे वर्णन केले आहे. 

मैं क्या वस्फ. कहुं यारो उस श्याम बरन अवतारी के।
श्री कृष्ण, कन्हैया, मुरलीधर मनमोहन, कुंज बिहारी के।।

बाल्यावस्थे पासूनच नटखट व मस्तीखोर कृष्णाने आपला महिमा दाखविण्यास सुरवात केली होती. एकीकडे त्यांनी बकासुर व पुतना ह्यांच्या सारख्या बलाढ्य राक्षसांचा संहार केला तर दूसरीकडे कालिया सारख्या विशालकाय नागास सुद्धा धडा शिकवला. तरुणावस्थेत त्यांनी कंसाचा संहार करून आपल्या माता - पित्याना कारावासातून मुक्त केले. परंतु, अजून विष्णू अवतार धारण करण्याचा मूळ उद्देश अपूर्ण होता जो कौरव - पांडव ह्यांच्या युद्धाचे वेळी कुरुक्षेत्री आपला मित्र अर्जुन ह्यास ७ दिवस गीता सांगून त्यांनी पूर्ण केला. जगभरात श्रीभगवद गीता ह्या नांवाने त्यास ओळखण्यात येते. ह्या युद्धाच्या माध्यमातून त्यांनी धर्माची ओळख जगास करून दिली. तसेच धर्माचरण करताना कित्येकदा कटू निर्णय घ्यावे लागले तरी सुद्धा धर्माची कास सोडू नये असेही सांगितले. ह्याच युद्धाच्या वेळेस आपल्या अवताराचा उद्देश ते खालील श्लोकातून समजावतात. 

यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।।
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ।।

ह्या श्लोकात विष्णू अवतारी श्रीकृष्ण सांगतात कि हे भारत (अर्जुन) वास्तवात जेव्हा जेव्हा धर्माचा लय होऊ लागतो व अधर्म वाढीस लागतो तेव्हा तेव्हा कोणत्याही रूपात मी लोकांसमोर प्रकट होत राहतो. पुढील श्लोकात ते सांगतात कि, मी साधूंचा उद्धार करण्यास, पापी व अधर्मी ह्यांचा विनाश करण्यास व धर्माची स्थापना करण्यासाठी युगा - युगा पासून जन्म घेत आलो आहे. 
भगवान श्रीकृष्ण ह्यांचे संपूर्ण जीवन दर्शन ह्या श्लोकात समाविष्ट आहे. ह्या श्लोकात ते असेही सांगतात कि अधर्माचा नाश व धर्माची स्थापना करण्यास सनातन काळा पासून ते कशा प्रकारे जन्म घेत आले आहेत व भविष्यात सुद्धा जेव्हा गरज भासेल तेव्हा पुन्हा ते अवतार धारण करतच राहतील.