रक्षाबंधन २०१९: दिनांक, महत्व, मुहूर्त व कथा

रक्षाबंधनाच्या दिवशी दिवसभर आहे शुभ मुहूर्त  


राशीनुसार भावाच्या हातावर राखी बांधून उज्वल करावे त्याचे जीवन 
बहीण - भावाच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाचा सण अनेक वर्षांनंतर १५ ऑगस्ट ह्या आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी येत आहे. विशेष म्हणजे हा योग चंद्राच्या श्रवण नक्षत्रावरच होत आहे. इतकेच नव्हे तर ह्या वर्षी राखी बांधण्यासाठी बहिणींना शुभ मुहूर्ताची वाट बघावी लागणार नाही, कारण ह्या दिवशी सूर्योदयापूर्वीच भद्रा सुद्धा समाप्त होत असल्याने दिवसभर राखी बांधण्यास शुभच आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी राशीनुसार सुद्धा आपल्या भावाच्या हातावर आपण राखी बांधू शकता. असे करणे हे शुभ समजले जाते. 

धार्मिक मान्यता 
तसे पाहू गेल्यास रक्षाबंधनाशी अनेक कथा व मान्यता जोडल्या गेल्या आहेत, मात्र धार्मिक मान्यतेनुसार महाभारत युगा पासून ह्याची सुरवात झाली असल्याचे मानण्यात येते. ह्या मान्यतेनुसार शिशुपालचा वध करत असताना भगवान श्रीकृष्ण ह्यांच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाला जखम होऊन त्यातून घळाघळा रक्त वाहू लागते. हे बघून द्रौपदी आपल्या साडीचा पदर फाडून श्रीकृष्णाच्या बोटास बांधते. असे म्हणतात कि त्या दिवसापासून श्रीकृष्ण हे द्रौपदीस आपली बहीण मानू लागले. कालांतराने पांडव द्रौपदीस द्यूत खेळताना जेव्हा हरले व कौरव द्रौपदीचे वस्त्रहरण करू लागले तेव्हा भावाचे कर्तव्य बजावताना श्रीकृष्णाने आपली बहीण द्रौपदी हिच्या लज्जेचे रक्षण केले. 

राशीनुसार बांधा राखी भावाला 
ज्योतिष शास्त्रानुसार जीवनात रंगाचे खूप महत्व असून त्यानुसार शुभ रंगाची राखी जर भावाच्या हातात बांधण्यात आली तर त्याचे फळ सुद्धा शुभच मिळते. तेव्हा आपणास आता हे समजू शकेल कि आपल्या भावाच्या हातात कोणत्या रंगाची राखी आपण बांधावी ते. 
मेष रास - ह्या राशीच्या भावास लाल रंगाची राखी बांधणे शुभ होईल. त्यामुळे भावाच्या जीवनात उत्साह व ऊर्जा टिकून राहाते. ह्या व्यतिरिक्त केशरी किंवा पिवळ्या रंगाची राखी सुद्धा आपण बांधू शकता. ह्या प्रसंगी भावास केशरी टिळा लावावा. 
वृषभ रास - ह्या राशीच्या भावासाठी पांढरा किंवा मोतीया रंगाची राखी शुभ असते. ह्या प्रसंगी भावास तांदळाचा टिळा लावावा. 
मिथुन रास - ह्यांच्यासाठी हिरवी किंवा चंदनाची राखी शुभ असते. ह्या प्रसंगी भावास हळदीचा टिळा लावावा. 
कर्क रास - ह्यांना पांढरा रेशमी धागा किंवा मोती ह्या पासून बनविलेली राखी बांधणे शुभ होय. ह्या प्रसंगी भावास चंदनाचा टिळा लावावा. 
सिंह रास - ह्यांच्यासाठी पिवळ्या किंवा गुलाबी रंगाची राखी शुभ असते. ह्या प्रसंगी भावास हळदीचा टिळा लावावा. 
कन्या रास - ह्यांच्यासाठी पांढरा रेशमी किंवा हिरव्या रंगाची राखी शुभ असते. ह्या प्रसंगी भावास हळद व चंदनाचा टिळा लावणे शुभ असते. 
तूळ रास - ह्यांच्यासाठी आकाशी निळ्या किंवा पांढऱ्या रंगाची राखी शुभ असते. ह्यांना केशराचा टिळा लावणे शुभ असते. 
वृश्चिक रास - ह्यांना गुलाबी, लाल किंवा चमकणारी राखी शुभ असते. ह्या दरम्यान भावास केशरी टिळा लावणे शुभ होय. 
धनु रास - आपला भाऊ धनु राशीचा असल्यास त्याला पिवळसर रेशमी रंगाची राखी बांधणे शुभ असते. त्यास हळद व कुंकवाचा टिळा लावावा. 
मकर रास - ह्यांना निळ्या किंवा गडद निळ्या रंगाची राखी शुभ असते. त्यांना केशराचा टिळा लावावा. 
कुंभ रास - ह्यांना रुद्राक्षाने बनविण्यात आलेली राखी शुभ असते. जर रुद्राक्षाची राखी शक्य नसली तर पिवळ्या रंगाची राखी बांधावी. त्यास हळदीचा टिळा लावावा. 
मीन रास - जर आपला भाऊ मीन राशीचा असेल तर त्यास पिवळ्या रंगाची राखी बांधावी. ह्या दरम्यान त्यास हळदीचा टिळा लावावा. 

रक्षा बंधन - १५ ऑगस्ट २०१९, गुरुवार 
राखी बांधण्याचा मुहूर्त : सकाळी ०५.५४ ते संध्याकाळी ०५.५९ पर्यंत 
कालावधी : १२ तास ०५ मिनिटे 
दुपारचा मुहूर्त : दुपारी ०१.४४ ते संध्याकाळी ०४.२० पर्यंत 
कालावधी : २ तास ३७ मिनिटे 
भद्रा : रक्षाबंधनाच्या दिवशी सूर्योदयापूर्वी समाप्त 
पौर्णिमा तिथी प्रारंभ : १४ ऑगस्ट २०१९ रोजी दुपारी ०३.४५ 
पौर्णिमा तिथी समाप्त : १५ ऑगस्ट २०१९ रोजी संध्याकाळी ०५.५८