प्रदोष व्रत २०१९ - प्रदोष व्रत कथा, विधी, तिथी व त्याचे फायदे

प्रदोष काळी भगवान श्रीशंकराचे पूजन केल्याने होत असते मोठी फलप्राप्ती 
अनेकदा लोक विचारतात व समजून घेण्याची इच्छा व्यक्त करतात कि प्रदोष व्रत केव्हा आहे, म्हणून आम्ही आपणास हे सांगत आहोत कि प्रदोष व्रत हे त्रयोदशीस म्हणजेच  प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील तेराव्या दिवशी करण्यात येते. ह्या दिवशी भगवान श्रीशंकराचे पूजन करण्यात येते. विशेष म्हणजे दिवस व रात्र ह्यांच्या संधीकाळी हे व्रत करणे अधिक चांगले असते असे समजण्यात येते. प्रदोष व्रताचे अत्यंत धार्मिक महत्व आहे व त्या दरम्यान केलेली भगवान श्रीशंकर ह्यांची पूजा अत्यंत फलदायी होत असून त्यामुळे शुभ फलांची प्राप्ती होते. प्रदोष काळी व्रत किंवा पूजन केल्याने इच्छापूर्ती होते असा एक समज आहे. 

प्रदोष व्रत कथा 
स्कंद पुराणानुसार एका गावात एक विधवा ब्राह्मण स्त्री आपल्या मुलासह राहून भिक्षा मागून आपला उदार निर्वाह करत होती. एके दिवशी ती भिक्षा घेऊन घरी परत येत असता नदी किनारी तिला एक बालक मिळाले. हे बालक विदर्भ देशातील राजकुमार धर्मगुप्त होते. शत्रूंनी त्याच्या पित्याचे राज्य बळकावून त्याची हत्त्या केली होती. धर्मगुप्ताच्या मातेचा मृत्यू आधीच झाला होता. ब्राह्मण स्त्रीने त्यास आपल्या घरी नेले. एके दिवशी शांडिल्य ऋषींनी त्या ब्राह्मण स्त्रीला प्रदोष व्रत करण्याचा सल्ला दिला. प्रदोष व्रतामुळे राजकुमार धर्मगुप्त ह्याचा विवाह गंधर्व राज्याच्या कन्येशी झाला. ज्याच्या मदतीने त्याने आपले गेलेले राज्य प्राप्त केले. 

प्रदोष व्रत केल्याने होत असते शुभ फलांची प्राप्ती  
ज्या प्रमाणे प्रत्येक महिन्याच्या एकादशीला पुण्य फलदायी समजण्यात येते त्याच प्रमाणे प्रत्येक शुक्ल व कृष्ण त्रयोदशीस केलेले व्रत हे अत्यंत शुभ फलदायी ठरते. एकादशीस भगवान श्रीविष्णू ह्यांचे पूजन करण्यात येते तर त्रयोदशीस भगवान श्रीशंकराची आराधना करण्यात येते. प्रदोष व्रत केल्याने सर्व प्रकारच्या दोषांचे निवारण होते अशी एक मान्यता आहे. तसे पाहू गेल्यास प्रदोष व्रतास खूप महत्व आहे, परंतु जर दिवसा प्रमाणे हे व्रत व पूजन केले तर शुभ फलांची वाढ होते. त्यामुळे आठवड्याच्या दिवसानुसार म्हणजे ज्या दिवशी हि तिथी येते त्या दिवसानुसार प्रदोष व्रत कथेचे पूजन करावे, कारण दिवसानुसार कथा सुद्धा वेग - वेगळी आहे. प्रदोष व्रतासाठी दिवसाचे सुद्धा विशेष महत्व असून त्यानुसार व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होते. 

शनी प्रदोष व्रताची विधी 
शनी प्रदोष असता सकाळी लवकर उठून स्नानादी नित्य कर्म करून भगवान श्रीशंकर  ह्यांची पूजा करावी. पूर्ण दिवस निराहारी राहून मनातल्या मनात “ऊँ नम: शिवाय”  ह्या मंत्राचा जप करावा. त्रयोदशीस प्रदोष काळी म्हणजेच सूर्यास्ताच्या तीन घटी पूर्वी शंकराचे पूजन (शनी प्रदोष व्रताची पूजा सायंकाळी ४.३० ते सायंकाळी ७.०० दरम्यान) करावे. सायंकाळी दुसऱ्यांदा स्नान करून स्वच्छ श्वेत वस्त्र धारण करून व पूजन करण्याच्या जागेचे शुद्धीकरण करून पूजा करावी. शंकराच्या मंदिरात सुद्धा पूजा करता येते. 

प्रदोष व्रतात करण्याचा आहार 
तसे पाहू गेल्यास प्रदोष व्रत हे पूर्ण दिवस निराहारी राहून करण्यात येते. ह्या व्यतिरिक्त आपण सकाळी नित्य कर्म आटोपून दूध घेऊ शकता. त्या नंतर दिवसभर काहीही खाऊ - पिऊ नये. प्रदोष काळी भगवान शंकराच्या पूजे नंतर फलाहार करू शकता, मात्र मीठ खाऊ नये. 

प्रदोष व्रताच्या उद्यापनाचे नियम 
प्रदोष व्रताचे उद्यापन हे त्रयोदशीसच करावे. मात्र, ह्याचे उद्यापन ११ किंवा २६ त्रयोदशी व्रत केल्या नंतरच करावे. व्रताचे उद्यापन करण्याच्या एक दिवस अगोदर श्रीगणेश पूजन करण्यात येते. त्या दिवशी सकाळी लवकर उठून पूजेची पूर्ण तयारी केल्यावर “ऊँ नम: शिवाय” ह्या मंत्राचा १०८ वेळा जप करून हवन करावे. ह्या दरम्यान कोणत्याही प्रकारचे अन्न प्राशन करू नये, कारण हे व्रत निर्जली राहून करावयाचे असते. 

शनी प्रदोषाचे महत्व 
तसे पाहू गेल्यास त्रयोदशीचे व्रत हे एक पुण्य व्रत असल्याचे समजण्यात येते, परंतु शनिदेव हे भगवान श्रीशंकराचे भक्त असल्याने शनिवारी येणाऱ्या त्रयोदशीस केलेले व्रत सर्व दोषां पासुन मुक्ती देते असा एक समज आहे. हे व्रत केल्याने भगवान श्रीशंकराच्या कृपेने निःसंतान असणाऱ्यांना सुद्धा संतती प्राप्ती होते. आणखी एक अशी हि मान्यता आहे कि ह्या दिवशी भगवान श्रीशंकराच्या पूजेने सर्व पापांचे क्षालन होते व मृत्यू पश्चात मोक्ष प्राप्ती होते. प्रदोष व्रत केले असता लोखंड, तीळ, काळे उडीद, मूळा, कांबळे, जोडे व कोळसा इत्यादी वस्तूंच्या दानाने शनी दोषा पासून मुक्ती मिळते.  

प्रदोष व्रत सामग्री 
- धूप, दीप, तूप, पांढरे फुल, पांढऱ्या रंगाची मिठाई, चंदन, पांढरे वस्त्र, जानवे, पाण्याने भरलेला कलश, कापूर, बिल्व पत्र, अक्षता, गुलाल, धोत्रा, भांग, हवनाची सामग्री, आंब्याचे टाळे इत्यादी.

प्रदोष व्रताचे फायदे
- रविवारी येणाऱ्या प्रदोषास रवी प्रदोष किंवा भानू प्रदोष ह्या नावाने संबोधण्यात येते. ह्या दिवशी हे व्रत केल्याने उत्तम आरोग्य व दीर्घायु प्राप्त होते. 
- सोमवारी येणाऱ्या प्रदोषास सोम प्रदोष ह्या नावाने संबोधण्यात येते. ह्या दिवशी हे व्रत केल्याने सकारात्मक विचारांची प्राप्ती होऊन सर्व मनोकामना पूर्ण होतात. 
- मंगळवारी येणाऱ्या प्रदोषास भौम प्रदोष असे म्हणतात. ह्या दिवशी व्रत केल्याने उत्तम आरोग्य प्राप्ती होऊन आजारपणातून मुक्ती होते व जीवनात समृद्धी प्राप्त होते. 
- बुधवारी येणाऱ्या प्रदोषास बुध किंवा सौम्य वार प्रदोष असे म्हणतात. ह्या दिवशी हे व्रत केल्याने सर्व मनोकामना व इच्छा पूर्ण होतात. 
- गुरुवारी गुरु प्रदोष होतो. ह्या दिवशी हे व्रत केल्याने शत्रूंवर मात करता येते व पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात. 
- शुक्रवारी शुक्र किंवा भृगु प्रदोष होतो. ह्या दिवशी हे व्रत केल्याने जीवनातील नकारात्मकता नष्ट पावते व वैवाहिक जीवन सुखद होते.
- शनिवारी शनी प्रदोष होतो, जो खूपच महत्वाचा असल्याचे मानण्यात येते. हे व्रत केल्याने संतती प्राप्ती व जीवनात यश प्राप्ती होते. 

प्रदोष व्रत तिथी २०१९ 
प्रदोष व्रत तिथीकडे विशेष लक्ष द्यावयास हवे, कारण ती सूर्यास्तावर आधारित असते. ज्या दिवशी सूर्यास्ता नंतर त्रयोदशी प्रबळ असते त्या दिवशीच हे व्रत करण्यात येते. त्यामुळेच काही वेळा प्रदोष व्रत हे त्रयोदशी पूर्वी एक दिवस आधी म्हणजेच द्वादशीस केले जाते. 
दिनांक                वार               व्रत                                      मुहूर्त 
३१ मे                शुक्रवार         शुक्र प्रदोष              संध्याकाळी ०७.१० ते रात्री ०९.१३ 
१४ जून             शुक्रवार         शुक्र प्रदोष              संध्याकाळी ०७.१६ ते रात्री ०९.१८ 
३० जून             रविवार          रवी प्रदोष               संध्याकाळी ०७.१९ ते रात्री ०९.२१ 
१४ जुलै            रविवार          रवी प्रदोष               संध्याकाळी ०७.१७ ते रात्री ०९.२१ 
२९ जुलै           सोमवार         सोम प्रदोष              संध्याकाळी ०७.१० ते रात्री ०९.१७
१२ ऑगस्ट      सोमवार         सोम प्रदोष               संध्याकाळी ०७.०० ते रात्री ०९.१०
२८ ऑगस्ट     बुधवार           बुध प्रदोष                संध्याकाळी ०६.४४ ते रात्री ०८.५९
११ सप्टेंबर       बुधवार           बुध प्रदोष                संध्याकाळी ०६.२८ ते रात्री ०८.४८
२६ सप्टेंबर      गुरुवार           गुरु प्रदोष                संध्याकाळी ०६.१० ते रात्री ०८.३५
११ ऑक्टोबर  शुक्रवार         शुक्र प्रदोष               संध्याकाळी ०५.५२ ते रात्री ०८.२३
२५ ऑक्टोबर  शुक्रवार         शुक्र प्रदोष              संध्याकाळी ०७.०८ ते रात्री ०८.१३
०९ नोव्हेंबर     शनिवार        शनी प्रदोष               संध्याकाळी ०५.२७ ते रात्री ०८.०६
२४ नोव्हेंबर     रविवार          रवी प्रदोष               संध्याकाळी ०५.२१  ते रात्री ०८.०४
०९ डिसेंबर     सोमवार         सोम प्रदोष               संध्याकाळी ०५.२० ते रात्री ०८.०६
२३ डिसेंबर     सोमवार         सोम प्रदोष               संध्याकाळी ०५.२५ ते रात्री ०८.११ 

श्रीगणेशजींच्या आशीर्वादांसह 
एस्ट्रो लोकमत डॉट कॉम