होलिका दहन २०१९: होलिका दहनाची कथा, शुभ मुहूर्त व पूजा विधी

होलिका दहनाने घरातील नकारात्मकतेस करा दूर 
रंगांचा सण होळी हा जगभरात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साजरा होतच असतो, परंतु बहुदा होलिका दहन करण्याचा प्रघात हा फक्त भारतातच आहे. हे एक प्रकारे चांगल्या प्रवृत्तींचा वाईट प्रवृतींवर असलेल्या विजयाचेच प्रतीक आहे. होलिका दहन हे रंगांच्या होळीच्या एक दिवस आधी म्हणजे फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेस केले जाते. ह्याच्या दुसऱ्या दिवशी रंगाने खेळण्याची पद्धत आहे, ज्यास धुळवड किंवा धूलिवंदन ह्या नावाने संबोधण्यात येते. 

होलिका दहनाचे नियम 
- ह्या वर्षी २०१९ च्या फाल्गुन पौर्णिमेस म्हणजेच २० मार्च ह्या दिवशी प्रदोष काळी होलिका दहन होईल. २० मार्चला भद्रेची शेपूट सायंकाळी ०५.३५ ते ०६.३५ दरम्यान तर भद्रेचे मुख सायंकाळी ०६.३५ ते ०८.१७ पर्यंत राहील. अशातच होलिका दहनाचा शुभ मुहूर्त रात्री ०८.५९ नंतरच होईल. 
- फाल्गुन शुक्ल अष्टमी ते फाल्गुन पौर्णिमे पर्यंतच्या दिवसांना होळाष्टक ह्या नावाने संबोधण्यात येते. ह्या दरम्यान शुभ कार्ये वर्जित असतात. 
- पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन करण्यात येते. होलिका दहनाच्या वेळेस भद्रा नसल्याचे बघितले जाते.   
- पौर्णिमा प्रदोष व्याप्त असावी. हे समजण्यासाठी सोपी पद्धत म्हणजे सूर्यास्ता नंतरच्या तीन प्रहरात पौर्णिमा तिथी असावयास हवी. 

होलिका दहनाची कथा 
पौराणिक आख्यायिके नुसार दैत्यराज हिरण्यकश्यपू स्वतःलाच देव समजत होता, परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू खेरीज कोणाचेही पूजन करत नसे. ह्यामुळे हिरण्यकश्यपू भयानकच क्रोधीत झाले व अखेर त्यांनी आपली बहीण होलिका हिला प्रल्हादेस आपल्या मांडीवर बसवून अग्नीत बसण्याचा आदेश दिला. होलिकेस आगीत तिचे काहीच नुकसान होणार नाही असा एक वर प्राप्त होता. मात्र, भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद आगीतून वाचला, व होलिका त्या आगीत जळून भस्मसात झाली. तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता. ह्या घटने नंतर होलिका दहन करण्याचा प्रघात पडला. त्या नंतर भगवान विष्णूंनी लोकांची अत्याचारातून सुटका करण्यासाठी नृसिंहाचा अवतार धारण करून हिरण्यकश्यपूचा वध केला.

होलिका दहनाचा इतिहास 
होळी सणाच्या बाबतीत अनेक प्राचीन माहिती मिळते. प्राचीन विजयनगर साम्राज्याची राजधानी हंपी येथे मिळालेल्या १६ व्या शतकातील एका चित्रातून होळी ह्या सणाचा उल्लेख होतो. इतकेच नव्हे तर विंध्य पर्वताच्या जवळ रामगढ येथून इसवीसन पूर्वे ३०० वर्ष आधीच्या मिळालेल्या अभिलेखातून  सुद्धा ह्याचा उल्लेख मिळतो. ह्याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने पूतना ह्या राक्षसीणीचा वध केला होता. त्याने आनंदून गोपिकांनी भगवान श्रीकृष्णांसह रंगाने होळी खेळून सण साजरा केला होता. 

होलिकेत ह्या आहुती द्याव्यात 
- होलिका दहना दरम्यान कैरी, नारळ, वांग, सप्तधान्य, साखरेतून बनविलेली खेळणी, सांकेतिक रूपात नवीन धान्याचा काही अंश ह्यांची आहुती देण्यात येते. 

होलिका दहन पूजा 
- होलिका दहना पूर्वी तिची पूजा करण्यात येते. 
- ह्या दरम्यान होलिके जवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करण्यात येते. 
- होलिकेस चारही बाजूने तीन किंवा सात फेर धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते. 
- शुद्ध पाणी व अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेस समर्पित करण्यात येते. 
- पूजे नंतर पाण्याने अर्घ्य देण्यात येतो. 
- एक तांब्या पाणी, अक्षता, गंध, पुष्प, गूळ, साबुदाणा, हळद, मूग, बत्तासे, गुलाल, नारळ, पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते. 
- नवीन धान्याचा अंश जसे कि गहू, चणे इत्यादींच्या लोंबी ह्यांची सुद्धा आहुती देण्यात येते.

होळी बद्धलची मान्यता 
- अशी मान्यता आहे कि होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते. 
- होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो. 

होलिका दहन 
- होलिकेची पूजा केल्या नंतर तिचे दहन केले जाते. 
- होलिका दहन नेहमी भद्रे नंतरच करावे. 
- चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथी असता होलिका दहन करण्यात येत नाही. 
- सूर्यास्ता पूर्वी सुद्धा होलिका दहन करू नये. 

होलिका दहनाचा शुभ मुहूर्त २०१९ 
होलिका दहन मुहूर्त :  १८.३६ ते २१.०० पर्यंत 
अवधी : २ तास २३ मिनिटे 
भद्रेचे शेपूट : १४.५३ ते १५.५४ पर्यंत 
भद्रेचे मुख : १५.५४ ते १७.३७ पर्यंत 

पौर्णिमा तिथी आरंभ : ०८.१४ वाजता २० मार्च २०१९ 
पौर्णिमा समाप्ती : ०४.४२ वाजता २१ मार्च २०१९ 
रंगांची होळी : २१ मार्च २०१९ 

श्रीगणेशजींच्या आशीर्वादांसह   
गणेशास्पीक्स डॉट कॉम / मराठी