श्रावण महिना २०१९: आपल्या राशीनुसार करा भगवान श्रीशंकराची आराधना


श्रावण महिना व देवांचे देव श्रीमहादेव ह्यांचे एक वेगळे असे नाते आहे. पुराणानुसार श्रावण महिन्यात श्रीशंकराची पूजा व अभिषेक केल्याने जलद व अधिक प्रमाणात लाभ होतो. त्याचमुळे भक्तजनांत श्रावण सोमवारी एक वेगळाच उत्साह असलेला दिसून येतो. श्रावण महिन्यात श्रीशंकरच सृष्टीचे संचलन करत असतात. श्रावण महिन्यात भगवान श्रीशंकर ह्यांच्या आराधनेस विशेष महत्व आहे. श्रावण महिन्यात रोज भगवान श्रीशंकर ह्यांची पूजा - अर्चा केल्यास ती अत्यंत फलद्रुप होते. भगवान श्रीशंकर हे अत्यंत भोळे व शीघ्रतेने प्रसन्न होणारे दैवत आहे. त्यांच्या भक्तजनांना कोणत्याही प्रकारे संकट व भीती ह्यांचा त्रास होत नाही. विशेषतः श्रावण महिन्यात भक्तजन त्यांची पूजा - अर्चा करून आपली मनोकामना पूर्णत्वास नेऊ शकतात. 

येथे आम्ही आपल्या राशीनुसार भगवान श्रीशंकर ह्यांची पूजा विधी सांगत आहोत, ज्यास आपण श्रद्धा पूर्वक केल्यास भगवान श्रीशंकर ह्यांचे आशीर्वाद प्राप्त करू शकाल. 

मेष रास 
ह्या राशीच्या व्यक्तींनी भगवान श्रीशंकर ह्यांना मध मिश्रित कच्च्या दुधाचा अभिषेक करून रक्त चंदन व लाल फुल अर्पण करावे. ह्या लोकांनी "नागेश्वराय नमः" हा जप करावा. ह्याने व्यावसायिक प्रतिष्ठा वाढेल. केलेले कष्ट सार्थकी लागतील. आर्थिक प्रगती होईल. 
वृषभ रास 
ह्या राशीच्या व्यक्तींनी भगवान श्रीशंकर ह्यांच्यावर दह्याने अभिषेक करावा व त्याच बरोबर शिवस्तुती करावी, बिल्वपत्र व चमेलीचे फुल अर्पण करावे आणि  रूद्राष्टकाचे पठन करावे. असे केल्याने मंगलकार्य किंवा सांस्कृतिक उत्सवात सहभाग मिळतो. व्यावसायिक प्रतिष्ठा वाढते. 
मिथुन रास
ह्या राशीच्या व्यक्तींनी भगवान श्रीशंकर ह्यांना उसाच्या रसाचा अभिषेक करावा. त्याने अनामिक भीती व क्रोध ह्यापासून मुक्तता होते. वरिष्ठांचे सहकार्य लाभते. भगवान श्रीशंकर ह्यांना धोत्र्याचे फुल, भांग अर्पण करून  "ॐ नमः शिवाय" ह्या मंत्राचा जप करावा. 
कर्क रास 
ह्या राशीच्या व्यक्तींनी भांग, साखर मिश्रित दूध ह्यांनी भगवान श्रीशंकर ह्यांच्यावर अभिषेक केल्यास ते शुभ फलदायी ठरते. रूद्राष्टकाचे पठन करावे. त्याच बरोबर धोत्र्याचे फुल शंकरास अर्पण करावे. ह्याने स्वास्थ्य चांगले राहते. व्यर्थ चिंतेतून मुक्ती मिळते. शैक्षणिक कार्यात यश प्राप्ती होते. 
सिंह रास 
ह्या राशीच्या व्यक्तींनी रक्त चंदनाच्या पाण्याने शंकरास अभिषेक करावा. भगवान श्रीशंकर ह्यांना कण्हेरीचे लाल फुल अर्पण करून शिव चालिसाचे पठन करावे. ह्याने शासनाचे सहकार्य लाभते. राजकीय महत्वाकांक्षा पूर्णत्वास जाते. व्यावसायिक प्रतिष्ठा वाढते. 
कन्या रास 
ह्या राशीच्या व्यक्तींनी भांग मिश्रित पाण्याने भगवान श्रीशंकर ह्यांच्यावर अभिषेक करावा. ह्यामुळे वडीलधारी व वरिष्ठ ह्यांच्या सहकार्याने यश प्राप्ती होते. ह्या राशीच्या शिवभक्तांनी भगवान श्रीशंकर ह्यांना बिल्वपत्र, धोत्र्याचे फुल, भांग इत्यादी अर्पण करून पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. 
तूळ रास 
ह्या राशीच्या व्यक्तींनी भगवान श्रीशंकर ह्यांना गायीचे तूप, अत्तर किंवा सुगंधी तेल मिश्रित दुधाने अभिषेक करावा. केशर मिश्रित मिठाईचा नेवेद्य अर्पण करावा. भगवान श्रीशंकरांच्या सहस्त्रनामाचे पठन करावे. ह्याने रचनात्मक प्रयत्न फलद्रुप होतात. बौद्धिक स्पर्धेत यश प्राप्ती होते. 
वृश्चिक रास 
ह्या राशीच्या व्यक्तींनी मध मिश्रित पाण्याने भगवान श्रीशंकर ह्यांना अभिषेक केल्यास शैक्षणिक क्षेत्रात केलेले श्रम सार्थकी लागतात. धन, यश व कीर्ती ह्यात वृद्धी होते. शासनाचे सहकार्य लाभते. मध नसल्यास साखरेचा वापर सुद्धा करता येतो. भगवान श्रीशंकरास गुलाबाचे फुल व बिल्वपत्र अर्पण करावे. रुद्राष्टकाचे पठन करावे. 
धनु रास 
ह्या राशीच्या व्यक्तींनी केशर मिश्रित दुधाने भगवान श्रीशंकर ह्यांना अभिषेक करावा. त्याच बरोबर शिव पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. भगवान श्रीशंकरास पिवळे फुल अर्पण करून खिरीचा नेवेद्य दाखवावा. शिवाष्टकाचे पठन करावे. संतती प्राप्तीची मनोकामना पूर्णत्वास येईल. भौतिक सौख्यात वृद्धी होईल.
मकर रास 
ह्या राशीच्या व्यक्तींनी तिळाच्या तेलाने भगवान श्रीशंकर ह्यांना अभिषेक केल्यास भौतिक सुख - साधनात वृद्धी होते. भगवान श्रीशंकरास बिल्वपत्र, धोत्र्याचे फुल, भांग व अष्टगंध अर्पण करून "पार्वतीनाथाय नमः" ह्या मंत्राचा जप करावा. 
कुंभ रास 
ह्या राशीच्या व्यक्तींनी संपूर्ण श्रावण महिना शहाळ्याचे पाणी, उसाचा रस, मोहरीचे तेल ह्याने भगवान श्रीशंकर ह्यांच्यावर अभिषेक करून शिवाष्टकाचे पठन करावे. त्याने संतती प्राप्ती होते. कौटुंबिक जीवन सुखद होते. 
मीन रास 
ह्या राशीच्या व्यक्तींनी केशर मिश्रित पाण्याने भगवान श्रीशंकर ह्यांना अभिषेक करावा. त्यांना पंचामृत, दही, दूध व पिवळे फुल अर्पण करून चंदनाच्या माळेने १०८ वेळा पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. त्याने कौटुंबिक व व्यावसायिक प्रतिष्ठेत वृद्धी होते. 

आचार्य कृष्णमूर्ती ह्यांच्या इनपुटसह 
एस्ट्रो लोकमत डॉट कॉम